कविवर्य बा. भ. बोरकर यांनी मराठी भाषेसह कोंकणी बोलीतसुद्धा तितक्याच सरस कविता लिहिल्या. गोमंतभूमीत लाडक्या व्यक्तीला "बाब' हे आदर व जिव्हाळ्याचे संबोधन मोठ्या प्रेमाने लावले जाते. बोरकरांनाही ते लावले जायचे, अजूनही लावले जाते. भाषावादात कोंकणीची बाजू घेतल्यामुळे मराठीवाद्यांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली असली, तरीही श्रेष्ठ मराठी कवी म्हणून त्यांचे स्थान आजही अढळच आहे. त्यांच्या कवितेवर गोमंतभूमीतील मराठी रसिक
आजही उत्कट प्रेम करतात.
सरिवर सरी आल्या गं
सचैल गोपी न्हाल्या गं...
गोपी झाल्या भिजून चिंब
थरथर कांपति निंब-कदंब
घनांमनांतुन टाळमृदंग
तनूंत वाजवि चाळ अनंग
पाने पिटिती टाळ्या गं
सरिवर सरी आल्या गं...
श्रावण- भाद्रपद महिन्यात गोमंतभूमीत असंख्य धार्मिक सोहळे होत असतात. घुमट नावाचे एक चर्मवाद्य आहे. इतर कोणत्याही मडक्याप्रमाणे या घुमटाला (मडक्याला) तोंड असते, तळाकडील बाजूही मोकळी असते. या मोकळ्या बाजूला घोरपडीचे कातडे घट्ट ताणून बसवलेले असते. हे झाले घुमट. वादक तोंडाकडील भागावर तळहात धरून उघडझाप करतो आणि दुसऱ्या हाताने ताणलेल्या कातड्यावर बोटांनी आघात करत राहतो. हे घुमटवादन सणाच्या दिवसांत गोव्यातील खेडोपाड्यात रात्रंदिवस घुमत असते. मृदंगाचीही साथ असतेच. शेमळे नावाचे आणखी एक चर्मवाद्य काड्यांनी वाजवले जाते आणि सौंदर्याने रसरसलेल्या गोमंतकीय सुंदरींच्या तनूंत तारुण्याचे चाळ वाजत असतात. पानांनी टाळ्या पिटीत अवघी सृष्टी ताल धरत असते. हे दृश्य गोमंतकाच्या अंतर्भागात वसलेल्या सर्व खेड्यांत दिसत असते. अध्यात्म आणि शृंगार यांचा अनोखा संगम बोरकरांच्या या कवितेत झालेला आहे...
मल्हाराची जळात धून
वीज नाचते अधूनमधून
वनांत गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदीं थिजून
घुमतो पांवा सांग कुठून?
कृष्ण कसा उमटे न अजून?
वेली ऋतुमति झाल्या गं
सरिंवर सरी आल्या गं...
हे वर्णन पावसात मुक्तपणे चिंब चिंब न्हाणाऱ्या झाडांचे आहे, यावर मोठ्या कष्टाने विश्वास ठेवावा लागतो, इतके ते ओलेत्या गोपींचे चित्रदर्शी वर्णन आहे. त्या चिंब चिंब झाडावेलींत ओलेत्या गोपी पाहणे याला काही वेगळीच रसिकता लागते. प्रसन्न शब्दकळेतून व्यक्त होणाऱ्या भावगर्भ आशयाबरोबरच विलक्षण नादमाधुर्य आणि काळजाला भिडणारी लय ही बाकीबाब यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. बोरकरांच्या कवितेची ओळख शाळेत असताना झाली. महाविद्यालयात "सौंदर्यकुंज'नावाचा वेचा अभ्यासाला होता. बालकवी, बोरकर, इंदिरा संत इत्यादींच्या उत्तमोत्तम 10-10 कविता या संग्रहात होत्या. त्यातून बोरकर थोडे अधिक कळले आणि आकळले. "चांदणवेल' हा त्यांच्या निवडक कवितांचा कुसुमाग्रज आणि गो. म. कुलकर्णी यांनी संपादित केलेला संग्रह पदव्युत्तरला अभ्यासाला होता. त्यानंतर मात्र बाकीबाब काळजातच घुसले. तोपर्यंत मी गोवा पाहिला नव्हता. मी गोवा तसा बराच उशिरा पाहिला, पण जेव्हा पाहिला तेव्हापासून बोरकरांच्या कवितेवर प्रेम करायला लागलो. चांगल्या कवितेचे जन्मस्थान शोधण्याचा छंद असल्याने मी बोरकरांच्या कविता कुठे जन्मल्या असतील असा विचार करीत गोवा फिरलो. "दुधसागरास..' ही तर तिच्या नावापासूनच आपले जन्मस्थान सांगते.. हास खदखदून असा हास दुधसागरालासल्या गिरिदरीत फेक फेस पांढरा... कवितेतला हा दुधसागर धबधबा प्रत्यक्षात तिथे जाऊन पाहिला, तर ही सबंध कविताच डोळ्यांपुढे उलगडत जाते.
हास्यीं तव वेदघोष,
सृजनाचा दिव्य तोष...
जीवनकल्लोळहर्ष
वर्षवी शुभंकरा...
...हे वर्णन म्हणजे काय, हे गोव्याच्या एका टोकाला, कर्नाटकच्या सीमारेषेजवळील मोलेमच्या जंगलात कोसळणारा तो धबधबा पाहिल्यानंतरच कळते. कर्नाटकातील लोंढा गावाकडून गोव्यात प्रवेश करताना मोलेम गाव आणि जंगल लागते. लोंढ्यातून येणारी रेल्वे दुधसागर धबधब्याच्या मधून जाते. पण रेल्वेतून धबधबा नीट पाहता येत नाही. खाली पडणाऱ्या तेवढ्याच धारा पळे - दोन पळे खिडकीतून पाहता येतात. हा दुधसागर थेट समोर उभे राहून पाहिला, तरच त्याचे विराट रूप समग्रपणे पाहता येते. दुधसागराच्या प्रतीकातून बोरकर ज्या चिरंतन हास्याचा शोध घेऊ पाहतात, तो हा खळाळणारा शुभ्र पाण्याचा कल्लोळ आपल्याला इथे पाहता- अनुभवता येतो. एकदा मी दोडा गावाच्या मार्गे चाललो होतो. काही निर्झर खळाळताना दिसले. दगडधोंड्यांतून घुसळत घुसळत निघालेली मोठ्या प्रवाहाची फेसाळती तिलारी नदी लागली. तिच्या काठी अनेक तुकड्यांमधून शेती डुलत होती. दाणे भरत आले होते. पिके तृप्त दिसत होती. सगळा भाग डोंगर- दऱ्यांचा, त्यामुळे सलग शेती आढळत नाही. तुकडे तुकडे दिसतात. गवतात चरणाऱ्या खट्याळ शेळ्या-मेंढ्या दंगा-मस्ती करत होत्या. काही शेरडे आईला लुचत होती. बांबूच्या कितीतरी मोठ्या बेटांतून वाऱ्याची दमदार शीळ ऐकू येत होती.... आणि रस्त्यावर उंच झाडांचे शेंडे खाली झुकल्याने मोठी कमान झालेली... त्याच कमानीतून आमची गाडी पुढे चालली होती. अन् ओठांवर ओळी आल्या...
निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेतें
थंडाव्याची कारंजीशी
कुठें गर्द बांबूची बेटें
कोठे तुटल्या लाल कड्यांवर
चपळ धीट बकरीची पोरें
एक त्यातले लुचे आईला
सटीन-कांती गोरें-गोरें
ही "चित्रवीणा' बाकीबाबना अशाच कुठल्यातरी ठिकाणी सुचली असेल.
"माझे घर' या कवितेत कवीने एक सुंदर स्वप्न पाहिले आहे. गोवा स्वतंत्र होण्यापूर्वीची ही कविता आहे. 26-09-1951 या दिवशी लिहिलेली. बोरकर प्रत्येक कवितेखाली ती लिहिल्याची तारीख देत असत, म्हणून हा संदर्भ येतो.
तृप्त स्वतंत्र गोव्यांत केव्हां तरी केव्हां तरी
त्या लाटांपाशी सिंधुसरितेच्या तीरीं
बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर
गार विलायती वेल चढवीन भिंतीवर
या पूर्ण कवितेत गोवा आणि गोव्याची संस्कृती प्रतिबिंबित झालेली आहे. हे एक स्वप्न आहे.. तीव्र इच्छा आहे... हे स्वप्न त्यांनी कागदावर उतरवले आणि त्यानंतर दहा वर्षांनी गोवा स्वतंत्र झाला.
जाळीं फेकणारे कोळी त्यांच्या मासळीच्या होड्या
खपणारे वावराडी त्यांच्या विसाव्याच्या विड्या
कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट
बांगड्यांशीं खेळणारा कधीं ओलेतीचा घट..
....असे खाडीच्या काठाचे घर त्यांच्या स्वप्नात होते. कवितेतील क्रूस गोव्यातील कॅथॉलिक ख्रिश्चन आणि हिंदू रहिवासी यांच्या सहजीवनाची प्रतिमा म्हणून येतो. प्रश्न असा निर्माण होतो, की त्यांच्या स्वप्नातले घर साकारले की नाही? बोरी येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. शिवाय नंतरच्या काळात त्यांचा पत्ता "पर्वरी आल्त' असा होता. ते त्यांच्या कन्येचे निवासस्थान आहे. या दोन्ही वास्तूंत आज बोरकरांचे नातलग राहतात. त्यांची बोरी गावातील वडिलोपार्जित वास्तू खाडीच्या काठाला आहे. पण सागराला जिथे नदी मिळते अशा आणखी एका रम्य स्थळी हे घर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती; पण ती आकाराला आली नाही असे झाले असेल का?
या कवितेचा शेवट करताना त्यांनी दोन ओळी लिहिल्या आहेत -
असें माझे गोड घर केव्हां तरी, केव्हां तरी
अक्षरांच्या वाटेनेंच उतरेल भुईवरी...
याचाच अर्थ असा आहे का, की हे घर प्रत्यक्षात उतरावे असे त्यांना वाटत तर होते, पण ते आकारास येणार नाही, हे त्यांना माहीत होते? म्हणूनच "अक्षरांच्या वाटेनेंच उतरेल भुईवरी' असे ते शेवटी म्हणतात?
गोमंतभूमीचे सौंदर्य आणि संस्कृती यांचे सुंदर सोनेरी वस्त्र गुंफणारी कविता म्हणजे "माझ्या गोव्याच्या भूमीत...' या कवितेत आलेले गोमंतभूमीचे वर्णन आजही तितकेच खरे आहे, सतेज आहे असे म्हणावे लागेल. कारण, खूप काळ लोटला, पर्यटन केंद्र म्हणून गोव्याचा विकास झाला, तो जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागला, गोवा हे तस्करांचे एक ठाणे बनले, सागरकिनाऱ्यांवर अमली पदार्थांचा खुलेआम व्यापार सुरू झाला, हे खरे असले तरी या कवितेत वर्णन केलेल्या मूळ सौंदर्य आणि संस्कृतीला अजून कसली बाधा आलेली नाही, हेही खरे.
माझ्या गोव्याच्या भूमीत चाफां पानावीण फुले
भोळाभाबडा शालीन भाव शब्दांवीण बोले
ही शालीनता बोरकरांनी पाहिलेल्या- अनुभवलेल्या गोमंतकाने अजून सहजसुंदरतेने जपलेली आहे.
सखे! चल सजवू कार्तिकमास
चांदणे भुलले आज उन्हास
गुरांवरी मोहरली मखमल
पालवीत जरतारी किलबिल
झुळुक नदीवरली ये शीतल लालुचवीत मनास
निवळ कोवळें तेथिल पाणी
शिळा गळे भरिती मोत्यांनीं
पोहत आंतुनि लता पोपटी कवटाळिति चरणास
...हे नवरात्रातील वर्णन आहे. महाराष्ट्रात नवरात्राला धार्मिक- सांस्कृतिक महत्त्व आहे; गोव्यातही! पण बोरकरांनी त्यातला नाजूक शृंगार शोधला. कार्तिक मासातील गारवा महाराष्ट्रात बोचरा असला, तरी गोव्यात सुखद असतो. इथे थंडी जाणवत नाही. म्हणून कार्तिक मास सजवायचा आहे तो सखीबरोबर!
"मिरामार' या कवितेत ते म्हणतात -
तांबडी जांभळीं वेदनेचीं
ढगांनी तशा गर्द संध्या फुले,
खुळे कावरेबावरे कावळेसे
जळोर्मीतले भाव काळेनिळे
शिडें पांढरी स्वप्नवेडी दिगंतीं
धुक्यांतील जैशा प्रभेच्या तृषा,
सुरूंच्या बनातून काळोख हिंडे
करूनी जरा गारव्याची नशा
मिरामार सागरकिनाऱ्याशी कोणती तरी वेदना खिळलेली असावी, जी या ओळींतून व्यक्त होते. इथून अगदी जवळच असलेल्या "दोना-पावल'शी या कवितेचा काहीतरी संबंध असावा. "दोना-पावल' या प्रेमिकांचा तेथे भीषण अंत झाला होता, मात्र तशी काही पुष्टी मिळाली नाही. पण आणखी एक संदर्भ समजला तो असा, की मिरामार हा पोर्तुगीज शब्द आहे. मार म्हणजे समुद्र. "मिरा' हा शब्द पोर्तुगीज आणि ऱ्हस्व "मि' असला तरी बोरकरांनी यात आपल्या मीरेचे दुःख पाहिले. सागरासारखे अथांग दुःख! त्यांना त्या किनाऱ्यावर फिरताना मीरेचे दुःख जाणवले.
बाकीबाब यांच्या कवितेची शब्दकळा खास गोमंतकीय आहे. "दोंगुरलीवर दिनकर पिवळा', "नितळ बुट्यांना रत्नकळा', "एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा', "मृगजळीचा मीनचसा', "पवनपिसोळे पिवळें रे', "शेरवडाच्या ढवळ्या पानीं', "किसलयकांत शरीर', "नीरफणसाचे झाड', "खपणारे वावराडी', "रुमडाला सुम आलें', "अंभोदांनी गगन भरले' इत्यादी... त्यांच्या कवितेतील जवळपास सर्व शब्दांवर अनुस्वार आहे. ते मराठी कविताही कोंकणी ढंगात सानुनासिक गायचे. त्यांची कविता गुणगुणत गुणगुणत जन्माला यायची. येतानाच ती अनुनासिक यायची. "मी जीवनाचा भक्त आहे आणि भोक्ताही' असे बाकीबाब म्हणायचे. त्यांनी जीवनाचा सर्वांगांनी आस्वाद घेतला. म्हणूनच "मज लोभस हा इहलोक हवा' असे म्हणतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कवितेतला गोवा मात्र कुठल्याही ठिकाणी भेटत राहतो!