Thursday, March 6, 2014

मर्ढेकरांची कविता - पिपात मेले ओल्या उंदिर




विसाव्या शतकातल्या मराठी कवितेचा आढावा घेताना मर्ढेकरांच्या पिपात मेले ओल्या उंदिर चा उल्लेख करणं भाग पडतं. मराठी काव्यातलं एक आयकॉन, एक पताकास्थान. एकदा झेंडा उभारला की काही जण ताठ मानेने फडकत राहातो. आसमंताचं लक्ष वेधून घेतो. कोणाला त्याकडे बघून अभिमान वाटतो. कोणी त्यापासून स्फूर्ती घेतो. कोणाला ती प्रगतीची निशाणी वाटते. तर काहींना ते अधोगतीचं फडफडतं प्रतीक वाटतं. पिपात मेले ओल्या उंदिरविषयी हेच झालं.बाळबोधपणाचं बंधन झुगारून देणारी, शक्तिवान प्रतिमांना सामावून घेणारी आधुनिक कवितेची रोवलेली गुढी वाटली. तर याच कवितेकडे बोट दाखवून अत्रेंसारख्या परंपराप्रेमींनी मराठी काव्याचं कसं अधःपतन होतंय हे त्यांच्या खास शैलीत ठणकावून सांगितलं.
कवितेच्या दुर्बोधपणाबद्दल मात्र सर्वांचंच एकमत होतं. पिंपाच्या तळात मेलेले सापडलेले ओलेगिच्च उंदिर कवीला दिसले आणि त्याविषयी त्याने काहीतरी कविता केली? पहाटे सूर्योदय पाहून प्रसन्न वाटून कविता स्फुरणं, एखाद्या फुलाच्या प्रेमात पडून शब्द आपोआप सुचणं, किंवा एखादं शोकांतिक दृश्य पाहून काव्यातून कळवळणं नवीन नाही. पण मेलेले उंदीर? हा कसला आलाय काव्याचा विषय? निव्वळ बीभत्स रस पिळून काढणारी ही कविता निश्चितच नाही. मग ही ओंगळ प्रतिमा निश्चित कशासाठी घेतलेली आहे? आणि या कवितेतून नक्की काय बोध घ्यायचा?
या कवितेचा अर्थ लावण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यातले बहुतेक मी वाचलेले नाहीत. जे काही वाचले आहेत त्यातले बहुतेक पटले नाहीत. अर्थात कवितेचा अमुक अर्थ बरोबर अमुक अर्थ चुकीचा असं म्हणणं थोडं धार्ष्ट्याचं ठरतं. त्यामुळे इतर अर्थ का पटले नाही हे सांगण्यापेक्षा मला जो अर्थ भिडला तो मी इथे थोडक्यात मांडतो.
मर्ढेकर हे शब्दप्रेमी होते. शब्दांच्या नादांशी खेळ केलेला त्यांच्या अनेक कवितांमधून दिसून येतो. विशेषतः एकाच नादातून दोन वेगवेगळ्या अर्थच्छटा निर्माण करणं (अब्द अब्द मनी येते), ओळखीच्या ओळींमधले शब्द थोडेसे बदलून पंक्ती लिहिणे (पोपटपंची चतुर्की जान; सालोसाल मरू दे मेला...) यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या एका कादंबरीमधला नायक संज्ञाप्रवाहाच्या मिषाने हेच अविरतपणे करत असतो. पिपात मेले मध्ये देखील त्यांनी अशाच दोन ध्वनिसाधर्म्य असलेल्या पण परस्परविरोधी अर्थच्छटा असलेल्या शब्दांवर खेळ केलेला आहे. तो कृत्रिमपणे अंगावर येऊ नये म्हणून ते शब्द कवितेत एकमेकांपासून लांबवर येतात. पण कवितेचा आत्मा त्यांमध्ये दडलेला आहे. ते दोन शब्द म्हणजे सक्ती आणि आसक्ती. या दोन शब्दांनी प्रतीत होणाऱ्या कल्पनांभोवती कविता फिरत रहाते.
पिपात मेले ओल्या उंदिर...
माना पडल्या आसक्तीविण

इथे पहिल्यांदा आसक्तीचा उल्लेख आहे. उंदीर उघड उघड मेलेले दिसतात. जगण्याची आसक्ती संपलेली आहे.
कवितेच्या मध्यभागात सक्तीचा उल्लेख येतो.
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे

जन्माला येणं आपल्या हातात नाही. किंबहुना आपलं 'आपणत्व' हेच जन्मानंतर ठरतं. आपण जन्मलोच नसतो तर आपण कोण असतो या प्रश्नाला अर्थच रहात नाही. गणितात शून्याने भागण्यासारखी ती शून्य अस्तित्वाची स्थिती ठरते. व्याख्येच्याच पलिकडची. कधी मरायचं, मरायचं की नाही हेही आपल्या हातात नाही. थोडी धडपड करून मरण लांबवता येतं थोडंफार, पण अखेरीला जन्माला आलेल्या कोणालाही मृत्यू चुकलेला नाही. मग या दोन टोकांच्या मध्ये येणारं नक्की काय आपल्या हातात आहे? तर ती म्हणजे आसक्ती. मानवाच्या आशा-आकांक्षा, स्वप्नं, इच्छा काढून घेतल्या तर ते जगणंच नाही.
इथे अर्थ उलगडून दाखवताना मी कवितेच्या सुरूवातीपासून ते कवितेच्या मध्यावर एकदम उडी मारलेली आहे. एखाद्या लांबलचक वाक्याचा अर्थ नीट लावताना आपण सुरूवातीला आलेल्या कर्त्याने नक्की काय केलं हे बघण्यासाठी क्रियापदाकडे बघावं तसं. 'अच्छा, रामने...खाल्ला. काहीतरी राम नावाच्या व्यक्तीने खाण्याविषयी हे विधान आहे, आणि मध्ये त्याने नक्की काय खाल्लं, तो आंबा कसा होता, तो कशा पद्धतीने खाल्ला याचं वर्णन आहे तर... चला, ते बारकावे समजावून घेऊ'अशा पद्धतीने विचार होतो. पिपात मेलेल्या उंदरांचंही थोडंसं तसंच आहे. ते कवीला दिसतात ते मेलेले. उंदिर...मेले. हे विधान आधी येतं. त्यांच्या असण्याबाबत, मरण्याबाबतची इतर विधानं नंतर येतात. ती समजून घेण्यासाठी आपल्यालादेखील आसक्ती आणि सक्ती अशी उडी मारावी लागते. सगळीच जर सक्ती असेल तर आसक्तीला अर्थच काय? असं छोटंसं वाक्य तयार होतं. मग या प्रश्नाला पुष्टी देणारी शब्दचित्रं कवितेत इतरत्र दिसायला लागतात.
पिपात मेले ओल्या उंदिर
माना पडल्या मुरगळल्याविण

ओठांवरती ओठ मिळाले
माना पडल्या आसक्तीविण

मेलेल्या उंदरांच्या माना निष्प्राण होऊन पडलेल्या आहेत. पण ते मरण मुरगळल्याशिवायच आलेलं आहे. त्या मृत्यूसाठी कोणी प्रत्यक्ष कर्ता नाही. काही बोट ठेवावं असं कारण नाही. मुख्य म्हणजे काही उद्दिष्ट नाही. या मरून पडलेल्या उंदरांचे ओठ ओठांना लागलेले आहेत. हे चित्र फारच केविलवाणं आहे. कारण या चुंबनात आसक्तीचा लवलेशही नाही.
गरिब बिचारे बिळात जगले
पिपांत मेले उचकी देउन

दिवस सांडला घाऱ्या डोळी
गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

इथे अर्थ लावण्यासाठी पंक्तींची थोडी मोडतोड करावी लागते. 'गरीब बिचारे, दिवस घाऱ्या डोळी सांडत बिळात जगले, आणि पिपांत उचकी देऊन व गात्रलिंग धुऊन घेऊन मेले'. घाऱ्या डोळ्यांवरून मांजरीची आठवण येते. नशिबी आलेल्या कुठल्यातरी बिळांमध्ये ते जगले. ते जगणंसुद्धा सरळसोट नव्हतं. त्यांना कायम घाऱ्या डोळ्यांची - मांजरीची - भीती होती. म्हणजेच मरणाची भीती त्यांना सुटली नाही. मरण आलं, ते कुठल्या पिंपातल्या पाण्यात बुडून. मृत्यूच्या पाण्याने त्यांच्या शरीरातल्या वासना, आसक्ती धुवून काढल्या. उरले ते निष्प्राण देह. आणि तरी त्यांचे ओठाला ओठ टेकलेले आहेत.
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे

उदासतेला जहरी डोळे
काचेचे पण;

त्यांच्या उदास आयुष्यात असलेले जहरी डोळे - मृत्यूची भीती - ही खरी का? पण सगळीच सक्ती असेल तर त्या भीतीला काय अर्थ आहे? काहीच नाही. म्हणून ते डोळेदेखील काचेचे - खोटे आहेत असं मर्ढेकर म्हणतात. जन्म आपल्या हाती नाही, मृत्यू कधीतरी येणारच आहे तर मग आपल्याला मृत्यूची भीती वाटते तीही सक्तीचीच नाही का? मग मृत्यू टाळण्यासाठी जे आपण करतो तेही खोटंच, निरर्थक. जीजिवीषाच खोटी. मग पुढे काय रहातं?
..........मधाळ पोळे
ओठांवरती जमले तेही
बेकलायटी, बेकलायटी

या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जीवन सार्थ करण्यासाठी आपण काही गोष्टी करतो. आपल्याला काही इच्छा, ऊर्मी असतात. आपण मनापासून कशावर तरी प्रेम करतो. आपल्या ओठांवर आपल्या प्रिय व्यक्तीच्या चुंबनासाठी प्रेमाचं मधाळ पोळं असतं. चुंबन हे अर्थातच आसक्तीचं, मीलनाचं, तृप्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे ते निव्वळ व्यक्तीलाच लागू न होता 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस' असं ज्या कशाविषयी वाटेल - मग तो परमेश्वर असो, एखाद्या लढ्यात विजय असो, एखाद्या तत्त्वासाठीची निष्ठा असो - जे जे आपण जीवनात आदर्श मानतो, ज्यासाठी झटतो, त्या सगळ्याच्या मीलनाला लागू होतं. ही आसक्तीदेखील खोटी, निरर्थक आहे. ते मधाळ पोळं, आपल्या मंजिलसाठी मनात असलेली आरजू, आपलं रेझॉन देट्र खरंखुरं नसून खोटं बेकलाईटचं (प्लास्टिकचं) आहे.
ओठांवरती ओठ लागले
पिपात उंदिर न्हाले! न्हाले!

या शेवटच्या ओळीत मर्ढेकरांनी तिरकसपणा ठासून भरलेला आहे. काहीशी गणपत वाण्याच्या स्वप्नपूर्तीची आठवण येते. त्यांना म्हणायचं आहे की इतकं असूनही आपण या निरर्थक आसक्तींमागे धावतो. आणि शेवटी ते मीलन झालं की आपल्याला कृतार्थ वाटतं. पण जिवंत असतानाचं चुंबन आणि मेल्यानंतर उंदरांचे लागलेले ओठाला ओठ यात तसा काहीच फरक नाही. कारण आसक्ती यादेखील कृत्रिमच आहेत. एकदा जन्मण्याची, जीवनाची आणि मरणाची सक्ती झाली की आसक्तीचीदेखील सक्तीच होते. मग कशालाच काही अर्थ रहात नाही. ओल्या पिपात मेलेले, ओठांवर ओठ टेकवणारे उंदीर अशा रीतीने जीवनाच्या निरर्थकतेचे रूपक आहेत.

5 comments:

  1. सुंदर.. सोपं करणे.. पुढील पिढीसाठी..

    ReplyDelete
  2. 🙏💯💯सुंदर वर्णन......!

    ReplyDelete
  3. गहन काव्याचा , काव्यार्थ छान उलगडला आहे

    ReplyDelete
  4. १० - १२ वीत अर्थ डोक्यावरून गेलेला , आता साठीत तुमच्या अनुभवातून/नजरेतून उलगडला.

    ReplyDelete