कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव
कवी म्हणजे साहित्य निर्माण कराणारा; मग तो कवी ,कथाकार, कादंबरीकार वा नाटककार असेल. वाचक हा रसिक पाहिजे कारण हिशोबाच्या चोपड्या तपासणारा वा वर्तमानपत्र चाळणारा वाचक इथे अभिप्रेत नाही. त्याला साहित्यात रस पाहिजे. ही आवड नसेल तर मग वाचक मेघदूतही दुकानदार किराण्याची यादी जा पद्धतीने वाचतो तसे वाचेल. तर असा रसिक वाचक काव्यानुभव कसा घेतो वा त्याने कसा घ्यावा याचा विचार या चर्चासत्रात व्हावा हा प्रयत्न.
अनुभव तुम्ही आम्ही सर्वच घेत असतो, प्रत्येक क्षणाक्षणाला. हा अनुभव घेतांना त्यात "रस" घेतलात तर तुमचे जीवन संमृद्ध होईल. अचानक आलेल्या पावसात कोण भिजले नाही? पण चरफडून छत्री न घेतल्याबद्दल स्वत:ला शिव्या घालण्याऐवजी जर स्वत: भिजण्यातली मजा घेत, इतरांची होणारी तारांबळ बघत, जर अशा पावसाची गंमत घेतलीत तर तुमचे अनुभव विश्व संमृद्ध होईल. हे विश्व जेवढे विशाल तेवढे काव्यानुभव घेणे सोपे. का?
तुम्ही जसे अनुभव घेत असता तेच कवीही घेत असतो. पण एकच घटना दोघांना निरनिराळे दर्शन घडवते.कवीची प्रतिभा (ही तर ईश्वराची देणगी) त्याच्या मनात वेगळे तरंग उठवते; त्याला त्याच्या प्रेयसीच्या गालावरून ओघळणारे आंसू आठवतात. आणि मग एका कवितेचा जन्म होतो. रसिक वाचकाला अशा एखाद्या कवितेचा आस्वाद घ्यावयाचा असेल तर त्याने झरझर झरणार्या पावसाच्या सरी उपभोगलेल्या पाहिजेत. काव्यानुभव घेण्यासाठी विश्वातील प्रत्यक्षानुभव पाहिजेच ! तीच गोष्ट तुमच्या वाचनाची. तुमचे वाचन जेवढे विशाल तेवढे रसास्वाद घेणे सोपे. सावरकर जेंव्हा सागराला दम भरतात ".. अबला न माझी ही माता रे,कथील हे अगस्तीस आता रे .." तेंव्हा याचा चपखलपणा लक्षात येण्यास अगस्तीची गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. आणखी एक.रसिकतेकरिता तुम्ही सहृदय पाहिजे. नेहमी "यात काय आणि त्यात काय़ " म्हणणार्या कोरड्या माणसांकरिता कविता नसतेच.
तर एक कवी आणि एक रसिक वाचक यांचा संबंध जोडते कविता. लिहित असतांना कविता कवीची.ती एकदा पूर्ण झाली व वाचकाच्या हातात पडली की मग ती वाचकाची. प्रत्यक्ष अनुभव व कवीला त्यातून आलेला काव्यानुभव, कवीने कवितेत मांडलेला असतो. आता वाचकाला आपले अनुभव व कवीचा काव्यानुभव यांची सांगड घालावयाची आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुमचे अनुभव! यामुळे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे कीं कवितेचा तुम्हाला भावलेला "अर्थ" हा तुमच्या पुरता १०० टक्के बरोबर असतो. दुसर्याने दुसरा अर्थ काढला म्हणून तुमचा अर्थ चूकीचा असे नाही. तिसरा तिसरा अर्थ काढेल, काय फरक पडला ? आणि हां, तुमचा अर्थ कवीच्या मनात असलेल्या अर्थाशी जुळलाच पाहिजे असेही नाही.तुम्ही वाचत आहा ती कविता सर्वस्वी तुमचीच आहे. परत तुम्हीच उद्या तीचा निराळा अर्थ लावलात तर बिचकू नका. तोही उद्यापुरता बरोबरच आहे. जीएंच्या कथेचा मला वीस वर्षांपूर्वी भिडलेला अर्थ व आजचा अर्थ नक्कीच निरनिराळे आहेत. नाही पटले? मग मला सांगा, तुम्ही एकदा तरी म्हणाला आहात ना
" अरे, वीस वर्षांपूर्वी शाळेत या कवितेचा अर्थ किती निराळा वाटत होता."
या मुक्त विचारांनंतर पु.शि. रेगे यांची एक कविता घेऊ. पु.शि.रेगेच कां ? तर त्यांच्या कवितेचा तुम्ही काहीही अर्थ लावा,मराठीचा कोणीही प्राध्यापक त्यावर आक्षेप घेत नाही. "नसती कटकट" म्हणतो, सोडून देतो.
लिलीची फुले
लिलीची फुले
तिने एकदां
चुंबितां, डोळां
पाणी मी पाहिले
लिलीची फुले
आता कधीही
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!
मी,ती, लिलीचे फुले आणि डोळ्यातील पाणी. पहिले कडवे भूतकाळातील, लिलीची फुले चुंबिताना ती भावविवश व तीच्या डोळ्यात पाणी, मी पाहतो,अलिप्ततेने. पण तीच्या भावनेचे लिलीशी जडलेले नाते आता त्याच्या मनात लिलीशीच जोडले गेले आहे.
दुसर्या कडव्यात ती नाही, काळ वर्तमान(व भविष्यही) पण आता केंव्हाही लिलीची फुले दिसली की ती फुले व त्यांच्याशी जोडले गेलेले संवेदनशील,अमूर्त प्रेम, त्यावेळची तीची करुण भावना, आता मीच्या डोळ्यात पाणी आणतात. पहिल्या कडव्यात भावना रुजली ,भिनली, तीची फुले दुसर्या कडव्यात फुलून आली. अशी विशुद्ध प्रेमकविता अबोल, अंतर्मुख करते.
No comments:
Post a Comment