Thursday, March 6, 2014

बोरकरांच्या कवितेतील गोवा...




कविवर्य बा. भ. बोरकर यांनी मराठी भाषेसह कोंकणी बोलीतसुद्धा तितक्‍याच सरस कविता लिहिल्या. गोमंतभूमीत लाडक्‍या व्यक्तीला "बाब' हे आदर व जिव्हाळ्याचे संबोधन मोठ्या प्रेमाने लावले जाते. बोरकरांनाही ते लावले जायचे, अजूनही लावले जाते. भाषावादात कोंकणीची बाजू घेतल्यामुळे मराठीवाद्यांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली असली, तरीही श्रेष्ठ मराठी कवी म्हणून त्यांचे स्थान आजही अढळच आहे. त्यांच्या कवितेवर गोमंतभूमीतील मराठी रसिक 

आजही उत्कट प्रेम करतात. 



सरिवर सरी आल्या गं 
सचैल गोपी न्हाल्या गं... 
गोपी झाल्या भिजून चिंब 
थरथर कांपति निंब-कदंब 
घनांमनांतुन टाळमृदंग 
तनूंत वाजवि चाळ अनंग 
पाने पिटिती टाळ्या गं 
सरिवर सरी आल्या गं... 



श्रावण- भाद्रपद महिन्यात गोमंतभूमीत असंख्य धार्मिक सोहळे होत असतात. घुमट नावाचे एक चर्मवाद्य आहे. इतर कोणत्याही मडक्‍याप्रमाणे या घुमटाला (मडक्‍याला) तोंड असते, तळाकडील बाजूही मोकळी असते. या मोकळ्या बाजूला घोरपडीचे कातडे घट्ट ताणून बसवलेले असते. हे झाले घुमट. वादक तोंडाकडील भागावर तळहात धरून उघडझाप करतो आणि दुसऱ्या हाताने ताणलेल्या कातड्यावर बोटांनी आघात करत राहतो. हे घुमटवादन सणाच्या दिवसांत गोव्यातील खेडोपाड्यात रात्रंदिवस घुमत असते. मृदंगाचीही साथ असतेच. शेमळे नावाचे आणखी एक चर्मवाद्य काड्यांनी वाजवले जाते आणि सौंदर्याने रसरसलेल्या गोमंतकीय सुंदरींच्या तनूंत तारुण्याचे चाळ वाजत असतात. पानांनी टाळ्या पिटीत अवघी सृष्टी ताल धरत असते. हे दृश्‍य गोमंतकाच्या अंतर्भागात वसलेल्या सर्व खेड्यांत दिसत असते. अध्यात्म आणि शृंगार यांचा अनोखा संगम बोरकरांच्या या कवितेत झालेला आहे... 



मल्हाराची जळात धून 
वीज नाचते अधूनमधून 
वनांत गेला मोर भिजून 
गोपी खिळल्या पदीं थिजून 
घुमतो पांवा सांग कुठून? 
कृष्ण कसा उमटे न अजून? 
वेली ऋतुमति झाल्या गं 
सरिंवर सरी आल्या गं... 



हे वर्णन पावसात मुक्तपणे चिंब चिंब न्हाणाऱ्या झाडांचे आहे, यावर मोठ्या कष्टाने विश्‍वास ठेवावा लागतो, इतके ते ओलेत्या गोपींचे चित्रदर्शी वर्णन आहे. त्या चिंब चिंब झाडावेलींत ओलेत्या गोपी पाहणे याला काही वेगळीच रसिकता लागते. प्रसन्न शब्दकळेतून व्यक्त होणाऱ्या भावगर्भ आशयाबरोबरच विलक्षण नादमाधुर्य आणि काळजाला भिडणारी लय ही बाकीबाब यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. बोरकरांच्या कवितेची ओळख शाळेत असताना झाली. महाविद्यालयात "सौंदर्यकुंज'नावाचा वेचा अभ्यासाला होता. बालकवी, बोरकर, इंदिरा संत इत्यादींच्या उत्तमोत्तम 10-10 कविता या संग्रहात होत्या. त्यातून बोरकर थोडे अधिक कळले आणि आकळले. "चांदणवेल' हा त्यांच्या निवडक कवितांचा कुसुमाग्रज आणि गो. म. कुलकर्णी यांनी संपादित केलेला संग्रह पदव्युत्तरला अभ्यासाला होता. त्यानंतर मात्र बाकीबाब काळजातच घुसले. तोपर्यंत मी गोवा पाहिला नव्हता. मी गोवा तसा बराच उशिरा पाहिला, पण जेव्हा पाहिला तेव्हापासून बोरकरांच्या कवितेवर प्रेम करायला लागलो. चांगल्या कवितेचे जन्मस्थान शोधण्याचा छंद असल्याने मी बोरकरांच्या कविता कुठे जन्मल्या असतील असा विचार करीत गोवा फिरलो. "दुधसागरास..' ही तर तिच्या नावापासूनच आपले जन्मस्थान सांगते.. हास खदखदून असा हास दुधसागरालासल्या गिरिदरीत फेक फेस पांढरा... कवितेतला हा दुधसागर धबधबा प्रत्यक्षात तिथे जाऊन पाहिला, तर ही सबंध कविताच डोळ्यांपुढे उलगडत जाते. 



हास्यीं तव वेदघोष, 
सृजनाचा दिव्य तोष... 
जीवनकल्लोळहर्ष 
वर्षवी शुभंकरा... 



...हे वर्णन म्हणजे काय, हे गोव्याच्या एका टोकाला, कर्नाटकच्या सीमारेषेजवळील मोलेमच्या जंगलात कोसळणारा तो धबधबा पाहिल्यानंतरच कळते. कर्नाटकातील लोंढा गावाकडून गोव्यात प्रवेश करताना मोलेम गाव आणि जंगल लागते. लोंढ्यातून येणारी रेल्वे दुधसागर धबधब्याच्या मधून जाते. पण रेल्वेतून धबधबा नीट पाहता येत नाही. खाली पडणाऱ्या तेवढ्याच धारा पळे - दोन पळे खिडकीतून पाहता येतात. हा दुधसागर थेट समोर उभे राहून पाहिला, तरच त्याचे विराट रूप समग्रपणे पाहता येते. दुधसागराच्या प्रतीकातून बोरकर ज्या चिरंतन हास्याचा शोध घेऊ पाहतात, तो हा खळाळणारा शुभ्र पाण्याचा कल्लोळ आपल्याला इथे पाहता- अनुभवता येतो. एकदा मी दोडा गावाच्या मार्गे चाललो होतो. काही निर्झर खळाळताना दिसले. दगडधोंड्यांतून घुसळत घुसळत निघालेली मोठ्या प्रवाहाची फेसाळती तिलारी नदी लागली. तिच्या काठी अनेक तुकड्यांमधून शेती डुलत होती. दाणे भरत आले होते. पिके तृप्त दिसत होती. सगळा भाग डोंगर- दऱ्यांचा, त्यामुळे सलग शेती आढळत नाही. तुकडे तुकडे दिसतात. गवतात चरणाऱ्या खट्याळ शेळ्या-मेंढ्या दंगा-मस्ती करत होत्या. काही शेरडे आईला लुचत होती. बांबूच्या कितीतरी मोठ्या बेटांतून वाऱ्याची दमदार शीळ ऐकू येत होती.... आणि रस्त्यावर उंच झाडांचे शेंडे खाली झुकल्याने मोठी कमान झालेली... त्याच कमानीतून आमची गाडी पुढे चालली होती. अन्‌ ओठांवर ओळी आल्या... 



निळ्या जळावर कमान काळी 
कुठे दुधावर आली शेतें 
थंडाव्याची कारंजीशी 
कुठें गर्द बांबूची बेटें 
कोठे तुटल्या लाल कड्यांवर 
चपळ धीट बकरीची पोरें 
एक त्यातले लुचे आईला 
सटीन-कांती गोरें-गोरें 



ही "चित्रवीणा' बाकीबाबना अशाच कुठल्यातरी ठिकाणी सुचली असेल. 
"माझे घर' या कवितेत कवीने एक सुंदर स्वप्न पाहिले आहे. गोवा स्वतंत्र होण्यापूर्वीची ही कविता आहे. 26-09-1951 या दिवशी लिहिलेली. बोरकर प्रत्येक कवितेखाली ती लिहिल्याची तारीख देत असत, म्हणून हा संदर्भ येतो. 



तृप्त स्वतंत्र गोव्यांत केव्हां तरी केव्हां तरी 
त्या लाटांपाशी सिंधुसरितेच्या तीरीं 
बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर 
गार विलायती वेल चढवीन भिंतीवर 



या पूर्ण कवितेत गोवा आणि गोव्याची संस्कृती प्रतिबिंबित झालेली आहे. हे एक स्वप्न आहे.. तीव्र इच्छा आहे... हे स्वप्न त्यांनी कागदावर उतरवले आणि त्यानंतर दहा वर्षांनी गोवा स्वतंत्र झाला. 



जाळीं फेकणारे कोळी त्यांच्या मासळीच्या होड्या 
खपणारे वावराडी त्यांच्या विसाव्याच्या विड्या 
कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट 
बांगड्यांशीं खेळणारा कधीं ओलेतीचा घट.. 



....असे खाडीच्या काठाचे घर त्यांच्या स्वप्नात होते. कवितेतील क्रूस गोव्यातील कॅथॉलिक ख्रिश्‍चन आणि हिंदू रहिवासी यांच्या सहजीवनाची प्रतिमा म्हणून येतो. प्रश्‍न असा निर्माण होतो, की त्यांच्या स्वप्नातले घर साकारले की नाही? बोरी येथे त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. शिवाय नंतरच्या काळात त्यांचा पत्ता "पर्वरी आल्त' असा होता. ते त्यांच्या कन्येचे निवासस्थान आहे. या दोन्ही वास्तूंत आज बोरकरांचे नातलग राहतात. त्यांची बोरी गावातील वडिलोपार्जित वास्तू खाडीच्या काठाला आहे. पण सागराला जिथे नदी मिळते अशा आणखी एका रम्य स्थळी हे घर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती; पण ती आकाराला आली नाही असे झाले असेल का? 
या कवितेचा शेवट करताना त्यांनी दोन ओळी लिहिल्या आहेत - 



असें माझे गोड घर केव्हां तरी, केव्हां तरी 
अक्षरांच्या वाटेनेंच उतरेल भुईवरी... 



याचाच अर्थ असा आहे का, की हे घर प्रत्यक्षात उतरावे असे त्यांना वाटत तर होते, पण ते आकारास येणार नाही, हे त्यांना माहीत होते? म्हणूनच "अक्षरांच्या वाटेनेंच उतरेल भुईवरी' असे ते शेवटी म्हणतात? 
गोमंतभूमीचे सौंदर्य आणि संस्कृती यांचे सुंदर सोनेरी वस्त्र गुंफणारी कविता म्हणजे "माझ्या गोव्याच्या भूमीत...' या कवितेत आलेले गोमंतभूमीचे वर्णन आजही तितकेच खरे आहे, सतेज आहे असे म्हणावे लागेल. कारण, खूप काळ लोटला, पर्यटन केंद्र म्हणून गोव्याचा विकास झाला, तो जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागला, गोवा हे तस्करांचे एक ठाणे बनले, सागरकिनाऱ्यांवर अमली पदार्थांचा खुलेआम व्यापार सुरू झाला, हे खरे असले तरी या कवितेत वर्णन केलेल्या मूळ सौंदर्य आणि संस्कृतीला अजून कसली बाधा आलेली नाही, हेही खरे. 



माझ्या गोव्याच्या भूमीत चाफां पानावीण फुले 
भोळाभाबडा शालीन भाव शब्दांवीण बोले 



ही शालीनता बोरकरांनी पाहिलेल्या- अनुभवलेल्या गोमंतकाने अजून सहजसुंदरतेने जपलेली आहे. 



सखे! चल सजवू कार्तिकमास 
चांदणे भुलले आज उन्हास 
गुरांवरी मोहरली मखमल 
पालवीत जरतारी किलबिल 
झुळुक नदीवरली ये शीतल लालुचवीत मनास 
निवळ कोवळें तेथिल पाणी 
शिळा गळे भरिती मोत्यांनीं 
पोहत आंतुनि लता पोपटी कवटाळिति चरणास 



...हे नवरात्रातील वर्णन आहे. महाराष्ट्रात नवरात्राला धार्मिक- सांस्कृतिक महत्त्व आहे; गोव्यातही! पण बोरकरांनी त्यातला नाजूक शृंगार शोधला. कार्तिक मासातील गारवा महाराष्ट्रात बोचरा असला, तरी गोव्यात सुखद असतो. इथे थंडी जाणवत नाही. म्हणून कार्तिक मास सजवायचा आहे तो सखीबरोबर! 
"मिरामार' या कवितेत ते म्हणतात - 



तांबडी जांभळीं वेदनेचीं 
ढगांनी तशा गर्द संध्या फुले, 
खुळे कावरेबावरे कावळेसे 
जळोर्मीतले भाव काळेनिळे 
शिडें पांढरी स्वप्नवेडी दिगंतीं 
धुक्‍यांतील जैशा प्रभेच्या तृषा, 
सुरूंच्या बनातून काळोख हिंडे 
करूनी जरा गारव्याची नशा



मिरामार सागरकिनाऱ्याशी कोणती तरी वेदना खिळलेली असावी, जी या ओळींतून व्यक्त होते. इथून अगदी जवळच असलेल्या "दोना-पावल'शी या कवितेचा काहीतरी संबंध असावा. "दोना-पावल' या प्रेमिकांचा तेथे भीषण अंत झाला होता, मात्र तशी काही पुष्टी मिळाली नाही. पण आणखी एक संदर्भ समजला तो असा, की मिरामार हा पोर्तुगीज शब्द आहे. मार म्हणजे समुद्र. "मिरा' हा शब्द पोर्तुगीज आणि ऱ्हस्व "मि' असला तरी बोरकरांनी यात आपल्या मीरेचे दुःख पाहिले. सागरासारखे अथांग दुःख! त्यांना त्या किनाऱ्यावर फिरताना मीरेचे दुःख जाणवले. 
बाकीबाब यांच्या कवितेची शब्दकळा खास गोमंतकीय आहे. "दोंगुरलीवर दिनकर पिवळा', "नितळ बुट्यांना रत्नकळा', "एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा', "मृगजळीचा मीनचसा', "पवनपिसोळे पिवळें रे', "शेरवडाच्या ढवळ्या पानीं', "किसलयकांत शरीर', "नीरफणसाचे झाड', "खपणारे वावराडी', "रुमडाला सुम आलें', "अंभोदांनी गगन भरले' इत्यादी... त्यांच्या कवितेतील जवळपास सर्व शब्दांवर अनुस्वार आहे. ते मराठी कविताही कोंकणी ढंगात सानुनासिक गायचे. त्यांची कविता गुणगुणत गुणगुणत जन्माला यायची. येतानाच ती अनुनासिक यायची. "मी जीवनाचा भक्त आहे आणि भोक्ताही' असे बाकीबाब म्हणायचे. त्यांनी जीवनाचा सर्वांगांनी आस्वाद घेतला. म्हणूनच "मज लोभस हा इहलोक हवा' असे म्हणतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कवितेतला गोवा मात्र कुठल्याही ठिकाणी भेटत राहतो!

कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव

कवी, रसिक वाचक आणि काव्यानुभव
कवी म्हणजे साहित्य निर्माण कराणारा; मग तो कवी ,कथाकार, कादंबरीकार वा नाटककार असेल. वाचक हा रसिक पाहिजे कारण हिशोबाच्या चोपड्या तपासणारा वा वर्तमानपत्र चाळणारा वाचक इथे अभिप्रेत नाही. त्याला साहित्यात रस पाहिजे. ही आवड नसेल तर मग वाचक मेघदूतही दुकानदार किराण्याची यादी जा पद्धतीने वाचतो तसे वाचेल. तर असा रसिक वाचक काव्यानुभव कसा घेतो वा त्याने कसा घ्यावा याचा विचार या चर्चासत्रात व्हावा हा प्रयत्न.
अनुभव तुम्ही आम्ही सर्वच घेत असतो, प्रत्येक क्षणाक्षणाला. हा अनुभव घेतांना त्यात "रस" घेतलात तर तुमचे जीवन संमृद्ध होईल. अचानक आलेल्या पावसात कोण भिजले नाही? पण चरफडून छत्री न घेतल्याबद्दल स्वत:ला शिव्या घालण्याऐवजी जर स्वत: भिजण्यातली मजा घेत, इतरांची होणारी तारांबळ बघत, जर अशा पावसाची गंमत घेतलीत तर तुमचे अनुभव विश्व संमृद्ध होईल. हे विश्व जेवढे विशाल तेवढे काव्यानुभव घेणे सोपे. का?
तुम्ही जसे अनुभव घेत असता तेच कवीही घेत असतो. पण एकच घटना दोघांना निरनिराळे दर्शन घडवते.कवीची प्रतिभा (ही तर ईश्वराची देणगी) त्याच्या मनात वेगळे तरंग उठवते; त्याला त्याच्या प्रेयसीच्या गालावरून ओघळणारे आंसू आठवतात. आणि मग एका कवितेचा जन्म होतो. रसिक वाचकाला अशा एखाद्या कवितेचा आस्वाद घ्यावयाचा असेल तर त्याने झरझर झरणार्‍या पावसाच्या सरी उपभोगलेल्या पाहिजेत. काव्यानुभव घेण्यासाठी विश्वातील प्रत्यक्षानुभव पाहिजेच ! तीच गोष्ट तुमच्या वाचनाची. तुमचे वाचन जेवढे विशाल तेवढे रसास्वाद घेणे सोपे. सावरकर जेंव्हा सागराला दम भरतात ".. अबला न माझी ही माता रे,कथील हे अगस्तीस आता रे .." तेंव्हा याचा चपखलपणा लक्षात येण्यास अगस्तीची गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे. आणखी एक.रसिकतेकरिता तुम्ही सहृदय पाहिजे. नेहमी "यात काय आणि त्यात काय़ " म्हणणार्‍या कोरड्या माणसांकरिता कविता नसतेच.
तर एक कवी आणि एक रसिक वाचक यांचा संबंध जोडते कविता. लिहित असतांना कविता कवीची.ती एकदा पूर्ण झाली व वाचकाच्या हातात पडली की मग ती वाचकाची. प्रत्यक्ष अनुभव व कवीला त्यातून आलेला काव्यानुभव, कवीने कवितेत मांडलेला असतो. आता वाचकाला आपले अनुभव व कवीचा काव्यानुभव यांची सांगड घालावयाची आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुमचे अनुभव! यामुळे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे कीं कवितेचा तुम्हाला भावलेला "अर्थ" हा तुमच्या पुरता १०० टक्के बरोबर असतो. दुसर्‍याने दुसरा अर्थ काढला म्हणून तुमचा अर्थ चूकीचा असे नाही. तिसरा तिसरा अर्थ काढेल, काय फरक पडला ? आणि हां, तुमचा अर्थ कवीच्या मनात असलेल्या अर्थाशी जुळलाच पाहिजे असेही नाही.तुम्ही वाचत आहा ती कविता सर्वस्वी तुमचीच आहे. परत तुम्हीच उद्या तीचा निराळा अर्थ लावलात तर बिचकू नका. तोही उद्यापुरता बरोबरच आहे. जीएंच्या कथेचा मला वीस वर्षांपूर्वी भिडलेला अर्थ व आजचा अर्थ नक्कीच निरनिराळे आहेत. नाही पटले? मग मला सांगा, तुम्ही एकदा तरी म्हणाला आहात ना
" अरे, वीस वर्षांपूर्वी शाळेत या कवितेचा अर्थ किती निराळा वाटत होता."
या मुक्त विचारांनंतर पु.शि. रेगे यांची एक कविता घेऊ. पु.शि.रेगेच कां ? तर त्यांच्या कवितेचा तुम्ही काहीही अर्थ लावा,मराठीचा कोणीही प्राध्यापक त्यावर आक्षेप घेत नाही. "नसती कटकट" म्हणतो, सोडून देतो.
लिलीची फुले
लिलीची फुले
तिने एकदां
चुंबितां, डोळां
पाणी मी पाहिले

लिलीची फुले
आता कधीही
पाहता, डोळां
पाणी हे साकळे...!

मी,ती, लिलीचे फुले आणि डोळ्यातील पाणी. पहिले कडवे भूतकाळातील, लिलीची फुले चुंबिताना ती भावविवश व तीच्या डोळ्यात पाणी, मी पाहतो,अलिप्ततेने. पण तीच्या भावनेचे लिलीशी जडलेले नाते आता त्याच्या मनात लिलीशीच जोडले गेले आहे.
दुसर्‍या कडव्यात ती नाही, काळ वर्तमान(व भविष्यही) पण आता केंव्हाही लिलीची फुले दिसली की ती फुले व त्यांच्याशी जोडले गेलेले संवेदनशील,अमूर्त प्रेम, त्यावेळची तीची करुण भावना, आता मीच्या डोळ्यात पाणी आणतात. पहिल्या कडव्यात भावना रुजली ,भिनली, तीची फुले दुसर्‍या कडव्यात फुलून आली. अशी विशुद्ध प्रेमकविता अबोल, अंतर्मुख करते.

देहान्त सन्याशी आईचा




सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची आई रुक्मिणीबाई नारायणराव भालेराव यांचं नुकतंच निधन झालं, सन्यास घेतल्यामुळे त्यांनी त्यांचं नाव ‘खेडकर आई’ असं धारण केलं होतं. निर्णय घेण्याची क्षमता असलेलं एक मोठं करारी व्यक्तिमत्त्व असं त्यांच वर्णन करावं लागेल, वसमत परिसरातील रिधोरा हे त्यांचं गाव इंद्रजित भालेराव यांनी आईचं व्यक्तिमत्त्व गांधारी काशीबाई या ललित लेखात मोठं मनोज्ञ रेखाटलं आहे, भालेरावांच्या पीकपाणी या पहिल्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार प्राप्त झाला (इ.स. 1989) त्यावेळी त्यांचा सत्कार गणेश वाचनालय या संस्थेने केला होता. त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे इंद्रजित भालेराव यांच्यासोबत त्यांच्या आईचाही सत्कार वाचनालयाने केला. ‘‘माझे सत्कार तर खूप होतील, पण माझ्या आईचा सत्कार कुणी पहिल्यांदाच केला,’’ असे मनोज्ञ उद्गार इंद्रजित भालेराव यांनी तेव्हा काढले होते. आपल्यावरच्या जबाबदार्‍या पूर्ण झाल्याच्यानंतर भालेराव सरांच्या आईंनी सन्यास घेण्याचा निर्णय घेतला. या  निर्णयातून त्यांच्या स्वभावातला कणखरपणा समजून येतो. चार मुली आणि चार सुना यांची सर्व बाळांतपणं झाल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं, सांसारिक जबाबदारीतून आपण मोकळं व्हायचं, बर्‍याच बायका असं ठरवतात; पण प्रत्यक्ष कृती करू शकत नाहीत. तेरा वर्षांपूर्वी खेडकर आईंनी मात्र हा निर्णय घेतला आणि कठोरपणे अमलात आणला. सन्याशाची वस्त्र परिधान केली आणि त्या वसमत येथील महानुभाव आश्रमात राहायला लागल्या. आपल्या कुटुंबातील एका तरी व्यक्तिने महानुभाव पंथासाठी काम करावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती. ही इच्छा त्यांनी स्वत:च्या कृतीतून पूर्ण केली. खरं तर सन्यासाचा जो विधी असतो तो कुटुंबियांना मोठं दु:ख देणारा असतो. आपल्या प्रिय व्यक्तिचे निधन झाले आहे, असं समजून विधी करायचा आणि तिच्याशी असलेलं लौकीक व्यवहाराचं नातं तोडायचं. खेडकर आईंनी वसमत येथील आश्रमात आपली सेवा रुजू केल्यानंतर कुटुंबीयांच्या सगळ्या अडीअडचणींपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवलं, प्रकृती जास्त खराब झाल्याच्या नंतर इंद्रजित भालेराव यांनी त्यांना विनंती करून योग्य उपचार लाभावेत म्हणून परभणीला आपल्या घरी आणून ठेवलं. खेडकर आईंनी घरात राहण्यास नकार दिला, कारण सन्याशाने संसारी लोकांच्या घरात राहायचं नसतं, तसेच अन्नही ग्रहण करायचे नसते. मग प्रश्न निर्माण झाला. त्यांची व्यवस्था करायची कशी? मग त्यांच्यासाठी स्वतंत्र वेगळी खोली इंद्रजित भालेराव यांनी तयार केली आणि त्यांची तिथे व्यवस्था केली. दररोज त्यांनी घरातल्या गृहिणीला जेवणासाठी भिक्षा मागावी आणि गृहिणीने त्यांना अन्न भिक्षा समजून दान द्यावे. इंद्रजित भालेरावांच्या पत्नी सौ. गया वहिनींनी अवघड काम निष्ठेने पार पाडले. शेवटच्या काळात खेडकर आईंची तब्येत जास्तच बिघडली. त्यांनी इतर बाह्य उपचारांना नकार दिला. आपला बाणा सोडला नाही. शेवटी त्या फक्त पाण्यावरती राहू लागल्या; पण आपल्यासाठी दिलेली वेगळी खोली असो ही सन्याशाची वस्त्र असो ही भिक्षा मागण्याचा नियम असो त्यांनी सोडला नाही. शेवटच्या क्षणी मुलीबाळी- लेकीसुना, नातवंडं, पतवंडं, खापर पतवंडं यांनी गजबजलेल्या घरात स्वत:चं सन्याशीपण जपत अलिप्तपणे प्राण सोडून दिले. परभणीला कार्यक्रम असला की, मी दुसर्‍या दिवशी परतीचं आरक्षण करून वापस यायचा माझा नियम; पण या वेळेस काहीच कारण नसताना कार्यक्रमानंतरचा दिवस मी परभणीला राहायचं असं ठरवलं. खरं तर भालेराव सरांच्या आईची तब्येत जास्त खराब आहे हे मला माहीत नव्हतं. कार्यक्रम संपल्यानंतर पाहुण्यांचे जेवणं झाल्यानंतर आसाराम लोमटेंनी उशीरा सरांच्या घरी जायची कल्पना मांडली, त्यांना तसा फोनही केला आणि रात्री साडे दहाला आम्ही पोहोचलो. आईंना त्रास होऊन नये म्हणून बाहेरच बसूत असं माझं म्हणणं होतं; पण सरांनी आग्रहाने त्यांच्या उशापाशी आम्हाला नेऊन बसवलं. ‘ती तुला शेवटपर्यंत ओळखायची, तिचं दर्शन घे, असं त्यांचं म्हणणं होतं.’ आईंची सगळी जाणीव हरपली होती. फक्त थोडंसं पाणी कोणीतरी तोंडात टाकलं की त्या ओठ मिटायच्या आणि परत उघडायच्या. डोळे बंदच होते. आम्ही गेल्यानंतर दहा-बारा मिनिटांतच रक्तासारखी काळपट उलटी त्यांना झाली आणि ते पाणी पिणंही बंद झालं. सरांनी आम्हाला रात्री जागत बसू नका, सकाळी या असा सल्ला दिला. त्यानंतर काही वेळातच आईचे प्राण उडून गेले.
त्यांनी जेव्हा सन्यास घेतला तेव्हा त्यांच्या त्या वृत्तीवर मला कविता सुचली होती, जी स्वत: इंद्रजित भालेराव यांना खूप आवडायची. त्यांनी त्यांच्या आईला ती म्हणून दाखवली. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायला जायचो. तेव्हा त्या थोडसं हसून थोडीशी अशी वेगळी ओळख द्यायच्या; पण त्या विषयावर काही बोलायच्या नाहीत. बाकीची मुलाबाळांची चौकशी करत राहायच्या. असं करारी व्यक्तिमत्त्व पिकलं पान गळून पडावं इतक्या सहजपणे गळून पडलं किंवा खरं तर उलटं म्हणता येईल. स्वत:ला स्वत:च्या वेळापत्रकाप्रमाणे पिकू देत या पानाने स्वत:चं गळणं अधोरेखित करून ठेवलं. भालेराव सरांच्या आईवरची ती कविता अशी :

आई कसा घेऊ शकते सन्यास
तिनं घेतला ध्यास
म्हणून तर रुजून आलं घराचं अस्तित्व
तणकटाच्या रानात


तिच्या तळखड्यांवर

तिनं हौसेनं पोसल्या
ती भरवायची
तिला उमगून आली
साठी सत्तरीच्या चढावर
घरात कोंडलेल्या


उभे राहिले खांब ताठ
तिच्या नाटींच्या आधाराने
कडीपाटांनी धरली सावली
तिच्या बळकट जोत्यावर
भक्कम ठाकल्या भिंती

म्हणून तर रुजल्या
परसात फुलांच्या
आसेरीत माणसांच्या बागा
तिनं घट्ट विणलेल्या नात्यांच्या वस्त्राचा
तीच तर होती जरीचा धागा

तेव्हा कुठे उतरायचा
लेकरांच्या गळ्याखाली घास
तरी तिनं ठरवलं घ्यायचा संन्यास

प्रत्येक फांदीची
स्वतंत्रपणे रुजून विस्ताराची भूक
तिनं सावरून घेतली
रुजलेल्या फांद्यांना अन्न पुरवायची चूक

तिला ऐकू आल्या
ऊरासोबत घराच्याही धापा
तिनं ठरवलं सोडायचा खोपा 

तिच्यातला आईला
आभाळानं हाक दिली
मातीनं अर्थ दिला
विश्‍वाची आई होत
तिनं जीव सार्थ केला

मर्ढेकरांची कविता - पिपात मेले ओल्या उंदिर




विसाव्या शतकातल्या मराठी कवितेचा आढावा घेताना मर्ढेकरांच्या पिपात मेले ओल्या उंदिर चा उल्लेख करणं भाग पडतं. मराठी काव्यातलं एक आयकॉन, एक पताकास्थान. एकदा झेंडा उभारला की काही जण ताठ मानेने फडकत राहातो. आसमंताचं लक्ष वेधून घेतो. कोणाला त्याकडे बघून अभिमान वाटतो. कोणी त्यापासून स्फूर्ती घेतो. कोणाला ती प्रगतीची निशाणी वाटते. तर काहींना ते अधोगतीचं फडफडतं प्रतीक वाटतं. पिपात मेले ओल्या उंदिरविषयी हेच झालं.बाळबोधपणाचं बंधन झुगारून देणारी, शक्तिवान प्रतिमांना सामावून घेणारी आधुनिक कवितेची रोवलेली गुढी वाटली. तर याच कवितेकडे बोट दाखवून अत्रेंसारख्या परंपराप्रेमींनी मराठी काव्याचं कसं अधःपतन होतंय हे त्यांच्या खास शैलीत ठणकावून सांगितलं.
कवितेच्या दुर्बोधपणाबद्दल मात्र सर्वांचंच एकमत होतं. पिंपाच्या तळात मेलेले सापडलेले ओलेगिच्च उंदिर कवीला दिसले आणि त्याविषयी त्याने काहीतरी कविता केली? पहाटे सूर्योदय पाहून प्रसन्न वाटून कविता स्फुरणं, एखाद्या फुलाच्या प्रेमात पडून शब्द आपोआप सुचणं, किंवा एखादं शोकांतिक दृश्य पाहून काव्यातून कळवळणं नवीन नाही. पण मेलेले उंदीर? हा कसला आलाय काव्याचा विषय? निव्वळ बीभत्स रस पिळून काढणारी ही कविता निश्चितच नाही. मग ही ओंगळ प्रतिमा निश्चित कशासाठी घेतलेली आहे? आणि या कवितेतून नक्की काय बोध घ्यायचा?
या कवितेचा अर्थ लावण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यातले बहुतेक मी वाचलेले नाहीत. जे काही वाचले आहेत त्यातले बहुतेक पटले नाहीत. अर्थात कवितेचा अमुक अर्थ बरोबर अमुक अर्थ चुकीचा असं म्हणणं थोडं धार्ष्ट्याचं ठरतं. त्यामुळे इतर अर्थ का पटले नाही हे सांगण्यापेक्षा मला जो अर्थ भिडला तो मी इथे थोडक्यात मांडतो.
मर्ढेकर हे शब्दप्रेमी होते. शब्दांच्या नादांशी खेळ केलेला त्यांच्या अनेक कवितांमधून दिसून येतो. विशेषतः एकाच नादातून दोन वेगवेगळ्या अर्थच्छटा निर्माण करणं (अब्द अब्द मनी येते), ओळखीच्या ओळींमधले शब्द थोडेसे बदलून पंक्ती लिहिणे (पोपटपंची चतुर्की जान; सालोसाल मरू दे मेला...) यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या एका कादंबरीमधला नायक संज्ञाप्रवाहाच्या मिषाने हेच अविरतपणे करत असतो. पिपात मेले मध्ये देखील त्यांनी अशाच दोन ध्वनिसाधर्म्य असलेल्या पण परस्परविरोधी अर्थच्छटा असलेल्या शब्दांवर खेळ केलेला आहे. तो कृत्रिमपणे अंगावर येऊ नये म्हणून ते शब्द कवितेत एकमेकांपासून लांबवर येतात. पण कवितेचा आत्मा त्यांमध्ये दडलेला आहे. ते दोन शब्द म्हणजे सक्ती आणि आसक्ती. या दोन शब्दांनी प्रतीत होणाऱ्या कल्पनांभोवती कविता फिरत रहाते.
पिपात मेले ओल्या उंदिर...
माना पडल्या आसक्तीविण

इथे पहिल्यांदा आसक्तीचा उल्लेख आहे. उंदीर उघड उघड मेलेले दिसतात. जगण्याची आसक्ती संपलेली आहे.
कवितेच्या मध्यभागात सक्तीचा उल्लेख येतो.
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे

जन्माला येणं आपल्या हातात नाही. किंबहुना आपलं 'आपणत्व' हेच जन्मानंतर ठरतं. आपण जन्मलोच नसतो तर आपण कोण असतो या प्रश्नाला अर्थच रहात नाही. गणितात शून्याने भागण्यासारखी ती शून्य अस्तित्वाची स्थिती ठरते. व्याख्येच्याच पलिकडची. कधी मरायचं, मरायचं की नाही हेही आपल्या हातात नाही. थोडी धडपड करून मरण लांबवता येतं थोडंफार, पण अखेरीला जन्माला आलेल्या कोणालाही मृत्यू चुकलेला नाही. मग या दोन टोकांच्या मध्ये येणारं नक्की काय आपल्या हातात आहे? तर ती म्हणजे आसक्ती. मानवाच्या आशा-आकांक्षा, स्वप्नं, इच्छा काढून घेतल्या तर ते जगणंच नाही.
इथे अर्थ उलगडून दाखवताना मी कवितेच्या सुरूवातीपासून ते कवितेच्या मध्यावर एकदम उडी मारलेली आहे. एखाद्या लांबलचक वाक्याचा अर्थ नीट लावताना आपण सुरूवातीला आलेल्या कर्त्याने नक्की काय केलं हे बघण्यासाठी क्रियापदाकडे बघावं तसं. 'अच्छा, रामने...खाल्ला. काहीतरी राम नावाच्या व्यक्तीने खाण्याविषयी हे विधान आहे, आणि मध्ये त्याने नक्की काय खाल्लं, तो आंबा कसा होता, तो कशा पद्धतीने खाल्ला याचं वर्णन आहे तर... चला, ते बारकावे समजावून घेऊ'अशा पद्धतीने विचार होतो. पिपात मेलेल्या उंदरांचंही थोडंसं तसंच आहे. ते कवीला दिसतात ते मेलेले. उंदिर...मेले. हे विधान आधी येतं. त्यांच्या असण्याबाबत, मरण्याबाबतची इतर विधानं नंतर येतात. ती समजून घेण्यासाठी आपल्यालादेखील आसक्ती आणि सक्ती अशी उडी मारावी लागते. सगळीच जर सक्ती असेल तर आसक्तीला अर्थच काय? असं छोटंसं वाक्य तयार होतं. मग या प्रश्नाला पुष्टी देणारी शब्दचित्रं कवितेत इतरत्र दिसायला लागतात.
पिपात मेले ओल्या उंदिर
माना पडल्या मुरगळल्याविण

ओठांवरती ओठ मिळाले
माना पडल्या आसक्तीविण

मेलेल्या उंदरांच्या माना निष्प्राण होऊन पडलेल्या आहेत. पण ते मरण मुरगळल्याशिवायच आलेलं आहे. त्या मृत्यूसाठी कोणी प्रत्यक्ष कर्ता नाही. काही बोट ठेवावं असं कारण नाही. मुख्य म्हणजे काही उद्दिष्ट नाही. या मरून पडलेल्या उंदरांचे ओठ ओठांना लागलेले आहेत. हे चित्र फारच केविलवाणं आहे. कारण या चुंबनात आसक्तीचा लवलेशही नाही.
गरिब बिचारे बिळात जगले
पिपांत मेले उचकी देउन

दिवस सांडला घाऱ्या डोळी
गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

इथे अर्थ लावण्यासाठी पंक्तींची थोडी मोडतोड करावी लागते. 'गरीब बिचारे, दिवस घाऱ्या डोळी सांडत बिळात जगले, आणि पिपांत उचकी देऊन व गात्रलिंग धुऊन घेऊन मेले'. घाऱ्या डोळ्यांवरून मांजरीची आठवण येते. नशिबी आलेल्या कुठल्यातरी बिळांमध्ये ते जगले. ते जगणंसुद्धा सरळसोट नव्हतं. त्यांना कायम घाऱ्या डोळ्यांची - मांजरीची - भीती होती. म्हणजेच मरणाची भीती त्यांना सुटली नाही. मरण आलं, ते कुठल्या पिंपातल्या पाण्यात बुडून. मृत्यूच्या पाण्याने त्यांच्या शरीरातल्या वासना, आसक्ती धुवून काढल्या. उरले ते निष्प्राण देह. आणि तरी त्यांचे ओठाला ओठ टेकलेले आहेत.
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे

उदासतेला जहरी डोळे
काचेचे पण;

त्यांच्या उदास आयुष्यात असलेले जहरी डोळे - मृत्यूची भीती - ही खरी का? पण सगळीच सक्ती असेल तर त्या भीतीला काय अर्थ आहे? काहीच नाही. म्हणून ते डोळेदेखील काचेचे - खोटे आहेत असं मर्ढेकर म्हणतात. जन्म आपल्या हाती नाही, मृत्यू कधीतरी येणारच आहे तर मग आपल्याला मृत्यूची भीती वाटते तीही सक्तीचीच नाही का? मग मृत्यू टाळण्यासाठी जे आपण करतो तेही खोटंच, निरर्थक. जीजिवीषाच खोटी. मग पुढे काय रहातं?
..........मधाळ पोळे
ओठांवरती जमले तेही
बेकलायटी, बेकलायटी

या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जीवन सार्थ करण्यासाठी आपण काही गोष्टी करतो. आपल्याला काही इच्छा, ऊर्मी असतात. आपण मनापासून कशावर तरी प्रेम करतो. आपल्या ओठांवर आपल्या प्रिय व्यक्तीच्या चुंबनासाठी प्रेमाचं मधाळ पोळं असतं. चुंबन हे अर्थातच आसक्तीचं, मीलनाचं, तृप्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे ते निव्वळ व्यक्तीलाच लागू न होता 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस' असं ज्या कशाविषयी वाटेल - मग तो परमेश्वर असो, एखाद्या लढ्यात विजय असो, एखाद्या तत्त्वासाठीची निष्ठा असो - जे जे आपण जीवनात आदर्श मानतो, ज्यासाठी झटतो, त्या सगळ्याच्या मीलनाला लागू होतं. ही आसक्तीदेखील खोटी, निरर्थक आहे. ते मधाळ पोळं, आपल्या मंजिलसाठी मनात असलेली आरजू, आपलं रेझॉन देट्र खरंखुरं नसून खोटं बेकलाईटचं (प्लास्टिकचं) आहे.
ओठांवरती ओठ लागले
पिपात उंदिर न्हाले! न्हाले!

या शेवटच्या ओळीत मर्ढेकरांनी तिरकसपणा ठासून भरलेला आहे. काहीशी गणपत वाण्याच्या स्वप्नपूर्तीची आठवण येते. त्यांना म्हणायचं आहे की इतकं असूनही आपण या निरर्थक आसक्तींमागे धावतो. आणि शेवटी ते मीलन झालं की आपल्याला कृतार्थ वाटतं. पण जिवंत असतानाचं चुंबन आणि मेल्यानंतर उंदरांचे लागलेले ओठाला ओठ यात तसा काहीच फरक नाही. कारण आसक्ती यादेखील कृत्रिमच आहेत. एकदा जन्मण्याची, जीवनाची आणि मरणाची सक्ती झाली की आसक्तीचीदेखील सक्तीच होते. मग कशालाच काही अर्थ रहात नाही. ओल्या पिपात मेलेले, ओठांवर ओठ टेकवणारे उंदीर अशा रीतीने जीवनाच्या निरर्थकतेचे रूपक आहेत.

Monday, March 3, 2014

मराठी काव्यातील 'माणिक' - कवी ग्रेस

इ.स. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी "ग्रेस" हे साहित्यिक नाव धारण केले. ''दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस'' या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली.



प्रकाश जळतो हळू हळू कि चंद्र जसा उगवे

पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका
दुखः सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका..



या ओळीतून जिथे कवीस प्रकाशाच्या उजळण्याच्या जागी प्रकाशाचे जळणे दिसते. किंवा निबिड अरण्यातील अनेक पावसात भिजून ,हिरवा कच्च शेवाळलेला वृक्ष जणू मूकपणेच त्या रंगाचा स्वीकार करीत आहे. आणि नेणिवेच्या जाणीवेतून आयुष्याच्या क्षितिजावर सुख दुःखाकडे तटस्थतेने पाहणारा मेघ आपोआपच परका वाटू लागतो.



ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
प्रथमदर्शनी कविता प्रेमावर असल्याचे वाटते ,नंतर लक्षात येते कि कविता आपला आशयच बदलते हळुहळु कवितेचे भाव बदलतात मग कवितेचा अर्थबोध होतो.
ती आई होती म्हणूनी, 
घनव्याकूळ मी ही रडलोत्यावेळी वारा सावध,
पाचोळा उडवित होताअंगणात गमले मजला, 
संपले बालपण माझेखिडकीवर धुरकट तेव्हा, 
कंदील एकटा होता
आई च्या वियोगातून ही कविता कविने मांडली आहे.आई गेल्याचे वर्णन अतिशय समर्पक शब्दात कविने केले आहे.आई गेल्याबरोबर कविला एकटेपणा जाणवू लागला त्यामुळे कवी रडू लागला कविला बालपन संपल्यासारखे वाटत होते त्या जनिवेतुन कविता प्रगटली आहे 
या आणि अशा अनेक अर्थपूर्ण कविता देताना या कवीने गूढता,दुर्बोधता याकडे खऱ्या अर्थाने पाहण्यस शिकवले.कवीता समजणे आणि कविता उलगडणे यातील अन्तर जर तुम्हास कमी करता येणार असेल तरच तुम्ही ग्रेस समजून घेवू शकाल.अर्थात स्वतः कवी ग्रेस यांनी त्यांच्यावर बसलेल्या दुर्बोध कवितांचा जनक या शिक्याची कधीच पर्वा केली नाही.

Thursday, February 13, 2014

कवी : नारायण हरी पालकर

कवी : नारायण हरी पालकर

काव्यसंग्रह : दुमदुमवू त्रिभवने

बिभ्वय जव उलटे फासा
बुडे धर्म, संस्कृती, स्वभाषा
दिसे जीवनी कुणा न आशा
फुलवायला पुन्हा  सत्याचा अंगार ।
उचलतो म्हणून बेलभांडार ।।

          शिव्छत्रपतींनी रायरेश्वराच्या चरणी प्रार्थना करून शपथ घेतली. ती शपथ का घेतली?? याचे वर्णन कवीने येथे केले आहे.  हि कविता म्हणजे एक प्रेरणा व वीरस्य प्रधान काव्य आहे. जेणे करून युवकांमध्ये देशप्रेम जागेल. ज्यावेळेस परकीय सत्तांचा देशाल अंमल होता. उत्तरेत मोगल, दक्षिणेत आदिलशाह, निजामशहा, कुतुबशहा, या राजवटींनी महाराष्ट्र काबीज केला होता. या राजवटींनी धार्मिक अराजकता निर्माण केली. महाराष्ट्रात दुष्काळ पडला. लोकांना जगण्याची आशाच उरली नव्हती. धर्म, संकृती, भाषा यांच्या संरक्षणासाठी आणि लोकांमध्ये सत्याचा, स्वातंत्र्याचा, अस्मितेचा अंगार फुलवायला व मराठी माणसात स्वराज्याबद्दल प्रेम व स्वराज्य स्थापण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात बेल  भंडारा उचलून शपथ घेतली होती.


टाकीन भंगून रिपु सिंहासन
धुली-मलिन ध्वज उंच उभारीन
हिंदू यशाचा डंका घुमविन
काय कमी रायरेश्वरा तव असल्यावर आधार।
उचलतो म्हणून बेलभांडार।।

          शिवराय म्हणतात टाकून भांडून रिपु सिंहासन शत्रूचा निष्पत करून मलिन झालेला भगवा ध्वज उंच फडकवेन. संपूर्ण देशाला स्वतंत्र करेन. अखंड विश्वात हिंदू यशाचा डंका घुमविन, पुन्हा रामराज्य निर्माण करण्याचा अट्टाहास शिवरायांमध्ये दिसून येतो. पुढे राजे म्हणतात जो पर्यंत शिवशंकरा, रायरेश्वरा तुझा आधार मिळाल्यावर तर अखंड हिंदुस्थानात पुन्हा हिंदूंचे राज्य निर्माण करीन हेच ध्येय मला पूर्ण करायचे असून तुझा आधार असल्यावर तर अखंड हिंदुस्थानात स्वराज्य निर्माण होईल आणि ते निर्माण केल्याशिवाय मी स्वस्थ बसू शकत नाही. आणि म्हणूनच मी बेलभांडार उचलून तुझी शप्पथ घेतो आणि ध्येय गाठण्याचा प्रयत्न करून स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार करतो.
         या कवितेत कवीच्या कल्पनशक्तित व  सृजनशक्तीचा साक्षात्कार होतोय़ कवितेतून कवीने रायरेश्वराच्या मंदिरातील प्रसंग उभेउभ साकारला आहे. यावरून आपणास कवीच्या देशप्रेमाचा देखील दिसते. कवीच्या अशा कवीतेमुळेच युवकांमध्ये देशप्रेम जगण्याचा व देशाबद्दलच्या अस्मितेची धग पेरव्न्यचे अहम् कार्य घडून येते.खरेतर सावरकर, सेनापती बापट, कवी गोविंद यांच्या कवितांच्या रांगेत नाना बसले. देशप्रेमाच्या कविता स्फुरण्यासाठी जाज्वल्य देशभक्ती असणे आवश्यक आहे.
          एकविसाव्या शतकात देखील भारतीय माणूस आपल्यदेशल भूमीला भारतमाता म्हणून संबोधते. त्याच्यासाठी मातृभूमी हीच मत जननी आहे. आपल्या आईसाठी मातृभुमिसाठीच त्याने जीवन अर्पण असते. कवीने देशप्रेमाने भारावून त्या कवितेची निर्मिती केल्याचे दिसून येते. या कवितेतून कवी शूरवीर अशा बाल शिवाजीच्या निर्धाराची जाणीव करून देतो यावरून कवीच्या सद्सद्विवेक बुद्धीची मात्र दिसून येते. कवीने छत्रपति शिवाजी महाराजांच्या कार्याची सुरुवात इतक्या कुशलतेने मांडली कि आपण कवितेच्या ओळी म्हणताना त्या काळात असल्याचा भास होतो. हि कविता आस्वाद घेण्यासाठी नसून, कर्णमधुर नसून जाज्वल्य देशप्रेम जगवण्यासाठीची आहे. काम, क्रोध, लोभ, मत्सर यापेक्षा हि स्वार्थ बुद्धीत ठेवता देशासाठी जगण्याची प्रेरणा देते. 

Monday, February 10, 2014

विंदा करंदीकर (शलाका)

कवी विंदा करंदीकर
कवितेचे नाव : शलाका

सत्य युगांतर -
                       सत्ययुगाच्या अखेर झाली
                       'प्रेम' द्वेष यांच्यात लढाई
                       द्वेष जाहला विजयी आणिक
                       वर्ष प्रेम आइच्या हृदयी

     खरे तर कलयुगात प्रेम हि संकल्पना फक्त स्वार्थी राहिली आहे. कारण जनमानसात फक्त स्वार्थ साधण्यासाठी प्रेमळ वागणारी लोक असतात परंतु देवानंतरची व्यक्ती आई आहे.आईचे प्रेम हे जगातील सर्वात अनमोल असते. म्हणूनच कवीला हि चारोळी सुचली असावी. जगाच्या इतिहासात हिंदू धर्म परंपरेनुसार चार युग आहेत. सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलयुग, -- सतयुगाच्या अखेरीत मनुष्य मात्र या पृथ्वीवर राहिले आहेत. आणि त्यात प्रेम आणि द्वेष यांच्यात लढाई  झाली. खरे तर माणसामाणसात भेद निर्माण झाला. आपापसातले प्रेम नाहीसे झाले  आहे. आणि द्वेषाला या जगात स्थान  मिळाले आहे. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत.त्याची साक्ष महायुद्धे देतात. एवढा द्वेष माणसाच्या आतल्या द्वेषामुळे निर्माण झाला. आणि प्रेम फक्त आई च्या हृदयात लपले. आई म्हणजे जगत जननी होय. कवीच्या चार ओळीत आई आणि प्रेम यांचा अर्थ कळतो. आई आणि प्रेम अशा गोष्टी आहेत ज्या जवळ असल्यावर त्यांची किंमत कळत नाही तर त्या लांब गेल्यावर कळते आणि डोळे अश्रुनी डबडबतात.

सारांश :           रामायण वाचुनिया नंतर
                       बोध कोणता घ्यावा आपण?
                       श्रीरामास मिलता नायक
                       वानरसुद्धा मारिती रावण

    रामायण वाचल्यानंतर पुरुशार्याची खरी व्याख्या काय हे कवीला दाखवायचे आहे. आज जगात अनेक नायक झालेत पण सगळेच महान होऊ शकले नाहीत. नेता जसा तसे लोक. नेत्याची, राजाची ओळख करून दिली " नेता कसा असावा " याचे उत्तम उदाहरण म्हणजेच प्रभू श्रीराम. होय, असा नेता जेव्हा मिळतो तेव्हा सामान्य माणूस देखील मोठमोठ्या शत्रूला हरवू शकतात. याचे अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपति शिवराय. शिवरायांसारखा नेता मिळाल्यामुळे या हिंदुस्थानात स्वराज्य निर्माण झाले. दऱ्या खोऱ्यातील मावळ्यांचा मनात प्रचंड देशप्रेम जागवून शिवरायांनी स्वराज्याची स्थापना  केली. नेतृत्व क्षमता ज्या व्यक्तीत असते तो समाजात नेता म्हणून मार्गदर्शन करतो व असामान्य  लोकांकडून करून घेतो. त्यामुळे नायक श्रीरामासारखा असणे अपेक्षित आहे.


इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पहस्थल त्याचे आणिक
चढुनी त्यावर भविष्य वाचा

इतिहासातून मानवाने बोध घेणे महत्वाचे असते. त्यातून जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन मिळत असते. परंतु मानव प्राणी इतिहासाला कवटाळून बसतो आपल्या पूर्व इतिहासाला कोसत बसतो. त्यातल्या चुका रटाळपद्धतीने घडोघडी चघळत असतो. त्यामुळे त्याचा भ्रमनिरास होऊन दुख्खाचा भोगी होतो आणि आपल्या भविष्याला अंधारात ठेवतो. त्यामुळे त्याच्या जीवनाची दिशाभूल होते.
                  खरेतर इतिहास म्हणजे जीवनात आपल्याकडून त्याच चुका पुन्हा होऊ नयेत आणि वर्तमानात त्यावर विचार करून व्यवस्थित व धीरोदात्तपणे योग्य पूल उचलल्यास उज्ज्वल भविष्य घडू शकते. त्यामुळे कवीने या चार ओळीच्या कवितेत खर्या अर्थाने जगण्याची वाट कशी निर्माण करावी हे शिकवले. त्यामुळेच या चार ओळीत जगण्याची ताकद मिळून देणारे शब्द दडलेत., या ओव्यांमद्धे कवीने इतिहासाचा अर्थ व्यापून टाकला आहे.